top of page

Himalay Camp Diary

Writer's picture: Ecological SocietyEcological Society

 

चक्राता सहल - दिवस पहिला

 (१८-ऑक्टो-२४)

दुरांतोतली धमाल

 

आमचा इकॉलॉजी क्लास म्हणजे Sustainable Management of Natural Resources & Nature Conservation ह्या विषयावरचा Post-graduate program. आमची ही 2024 -25 ची बॅच. इकॉलॉजी क्लासमध्ये लेक्चर्स आणि फिल्ड विझिट्स असतात. पण त्यातली स्टार अॅट्रॅक्शन असलेली सहल म्हणजे चक्राता  सहल. त्या सहलीची अनाऊन्समेंट झाली आणि तिकीट बुकिंग, कॅमाफ्लॉज खरेदी, व्हाया रेहकुरी ग्रासलँड सहल करता करता ऑक्टोबर महिना आला. महाजन सरांचं आणि हिमांशू सरांचं लेक्चर झालं आणि इकॉलॉजी स्टुडंट्स आणि हिमालयात आता केवळ 'कुछ चंद दिनोंकी दूरी है' हे जाणवलं. 

18 ऑक्टोबरला 11 वाजता 12263 निझामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेसने निघालो. एकोणीस जणांचा मोठा ग्रुप. वेगवेगळ्या बर्थवर असूनही A3 मधल्या 15, 16, 17, 18 मध्ये सगळ्यांनी अड्डा जमवला आणि धम्माल सुरु झाली. ट्रेन सुटायच्या आधीच खानपान सुरु झालं. सगळ्यांनी उत्साहाने खाण्यातली विविधता दाखवत  बॅगांचं वजन कमी करायला आणि आपापलं वजन वाढवायला सुरुवात केली.

गप्पा, खाणं, लंच, खाणं, डंबशेराज, खाणं, डिनर, खाणं...खाणं थांबवायला बडीशेप आणि सुरु करायला शेंगा.... आपण स्टडी टूर वर आहोत हे लक्षात घेऊन कोणीतरी मधूनच बाहेरचं लँडस्केप, गवत, झाडं , मँग्रोव्हज, वेटलँड असं काहीतरी बोले आणि पुन्हा गप्पा व खाण्याकडे वळे. डंबशेराजमध्ये  कधीच न पाहिलेला, ऐकलेला पिक्चर डिस्क्राइब करताना पार्टिसिपंट त्यातल्या ॲक्टर्सपेक्षा चांगली ॲक्टिंग करत होते. आजूबाजूच्या  पॅसेंजरनी आवाज थोडा कमी करण्याची विनंती केली असली तरी आमची नुसती धमाल मजामस्ती चालू नव्हती. नदीचे प्रश्न, कचरा व्यवस्थापन , शहरातलं जगणं, सस्टेनेबल लिव्हिंग, गावात जागा घेऊन राहणं अशा वेगवेगळ्या विषयांवर नॉलेज शेअरिंग आणि चर्चा झडल्या. माकडांच्या उपद्रवासाठीचे नेट, हरणं आणि इतर गाईगुरांसाठीचे खंदक (आणि त्यात मगरी सोडणं 😛) अशा अनेक नवीन गोष्टी कळल्या.

उद्यासाठी एनर्जी हवी आहे असं एकमेकांना बजावत सगळेजण लवकर झोपायला आपापल्या बर्थवर गेले. सकाळी उठून ही मंडळी पुन्हा आवाज करणार ह्या भितीने दुरांतो नेहमीपेक्षा जरा जास्तच जोरात धावली आणि चक्क चाळीस मिनीटं आधीच आम्हाला निजामुद्दीन स्टेशनवर उतरवून तिने सुटकेचा निश्वास सोडला. 😀😃


चक्राता सहल - दिवस दुसरा

 (१९-ऑक्टो-२४)

दिल्ली ते चक्राता व्हाया डेहराडून

 

निजामुद्दीन स्टेशनवर उतरलो आणि सामानाचा आणि माणसांचा पुन्हा पुन्हा काऊंट घेऊन आम्ही आमचा मोर्चा वेटिंग रुम उर्फ लाउंज कडे वळवला. पुन्हा थेपले, पराठे, लाडू वगैरे डब्यातून बाहेर आले आणि पोटात विराजमान झाले. कसंही गरम पाणी चहा म्हणून चालणाऱ्यांनी तिथेच चहा घेतला आणि चोखंदळ मंडळी चहाच्या शोधात बाहेर पडली. चहा झाला आणि डेहराडूनसाठीच्या बससाठी मंडळी निघाली.  चक्रातासाठी वॉर्मअप म्हणून वजन घेऊन सगळ्यांचा एक छानसा वॉक झाला. विमानानी दिल्लीला आलेले आमच्यासोबत बसमध्ये होते तर डायरेक्ट डेहराडूनला पोचलेले तिथून चक्राताकडे  आधीच रवाना झाले होते.

सिमेंटी श्रीमंतीची सूज आलेली प्रदूषणाने वेढलेली दिल्ली बघून गेल्या काही वर्षांपासून पुणंही ह्याच दिशेने चाललंय हा  विचार मनात आला. विकासाच्या ह्या मॉडेलला फॉलो करणं थांबवायला हवं हे पुन्हा एकदा जाणवलं.

मेरठ रुरकी करत आम्ही डेहराडूनला जायला निघालो.शनिवार सकाळची वेळ. ट्राफिक कमी असल्यामुळे फटाफट दिल्लीच्या बाहेर आलो.  रस्त्यावरून जाताना तरी पुणं अजूनही दिल्लीपेक्षा हिरवं आहे असं वाटत होतं.  मग हळूहळू शेती दिसायला लागली. लांबलचक सपाट मैदानं आणि त्यावरची शेती,  लांब लांबवर पसरलेली उसाची शेती बघत बस उत्तराखंड राज्यात आली. शिव बाबा धाब्यावर 'देसी घी' वाले वेगवेगळे गुबगुबीत पराठे भरपेट खाल्ले. त्याच्याकडे आम्ही आग्रहाने बॉटल्ड पाणी नाकारलं आणि त्याच्याकडचं फिल्टर्ड पाणी प्यायलं. हे प्रदूषणमुक्ततेकडे घेऊन जाणारं एक छोटसं पाऊल.

मेरठ सोडलं आणि उसाच्या शेतीबरोबरच बांधावर तर कुठे कुठे पूर्ण शेतातच पॉप्लरची भरपूर लागवड केलेली दिसत होती.  पेपर पल्प, मॅच स्टिक, प्लायवूडसाठी या झाडाचा उपयोग होतो. आंब्याच्या मोठमोठ्या बागाही दिसत होत्या. एकूणच हिरव्या रंगाचं डॉमिनन्स दिसत होतं. माती कोरडी दिसत होती, कडक उन होतं, हवा तापलेली होती, पण नुकताच पावसाळा संपल्यामुळे रखरखीतपणा नव्हता.

छानपैकी हॉर्न वगैरे वाजवत गाडी सुसाट चालली होती. आणि अचानक कोरड्या नदीचं विस्तीर्ण पात्र लागलं आणि पूर्ण लँडस्केप बदलून गेलं. नदीची धार अगदीच गरीब. पण पूर्वापार श्रीमंतीच्या सगळ्या खुणा असलेली खानदानी दिसत होती ती. आणि त्या नदीवर बांधलेला पूल अतिशय उद्धट, उन्मत्त. पूल असावा तर वासुदेव टोपलीतून बाळकृष्णाला नेत असल्यासारखा अदबशीर,  विनयशील. अशा वेळेस नदीही आपणहून वाट करुन देते. इथे तर बिकास नावाचा सिमेंटी माज. तरीही निसर्गाला खिन्न व्हायला वेळ नव्हता.  आजूबाजूचं शिवालीक रेंजमधलं राजाजी टायगर रिझर्व्ह नावाचं सुंदर जंगल डेहराडूनच्या सीमेवर सगळ्यांच्या स्वागताला हजर होतं.

नीम, महानीम, कांचन, पांगारा आणि मग आंबा , ताम्हण, जांभूळ सारखी आपल्याकडे दिसणारी झाडं मागे पडून साल सारखी मजबूत बांध्याची उंच झाडं दिसू लागली होती. गाडीतूनच साल, कांचनवेल, धावडा, अधूनमधून कोनिफर्स बघत बघत आम्ही पुढे जात होतो. कांचनवेल म्हणजे कांचन किंवा आपट्यासारखी  पण मोठ्या आकाराची पानं असलेली वेल. आधी खूप जिविधता दिसत होती पण पुढे पुढे सालचं मोठ्या प्रमाणात प्लांटेशन केलेलं दिसत होतं. ब्रिटिश काळात रेल्वे स्लीपर्ससाठी मोठ्या प्रमाणात साल, टिक वुड कापले गेले होते. हे प्लांटेशन अलिकडच्या काळात केलेलं.

जंगल संपलं आणि थोड्याच वेळात डेहराडून आलं. प्रथमदर्शनी पाहून डेहराडूनने मनावर छाप पाडली नाही. कोणत्याही निमशहरासारख्या दिसणाऱ्या या गावात मोठमोठ्या educational institutions आहेत हे जाणवत नाही. ट्राफिक, धूळ, हॉर्नचे आवाज सगळं काही आपल्या परिचयाचं.  सगळ्या दुकानांच्या पाट्या लाल रंगात रंगवलेल्या हे एक वेगळेपण दिसलं. विकासनगरमध्ये  सहा सातजण एकेका जीपमध्ये बसून चक्राताकडे जायला निघालो. डेहराडूनमध्ये कडक ऊन होतं आणि चांगलंच गरम होत होतं. 

जस्ट दोन अडीच तासात  सहाशे मीटर ते 2200 मीटर अल्टीट्युड म्हणजेच महाजन सरांनी दाखवलेल्या नकाशाप्रमाणे तराई, शिवालीक , बाभर करत मिडल हिमालयपर्यंतचं भौगोलिक वैविध्य  अनुभवणार होतो.  300 ते 900 मीटर हा ट्रॉपिकल तर 1000 ते 2000 मीटर्सचा पट्टा  टेंपरेट फॉरेस्टचा. मधल्या बाभेरचा शुष्क भाग कधी आला आणि गेला ते आम्हाला कळलंच नाही. टप्प्याटप्प्यावर जंगलाचा पोत बदलत होता.  गाडीतले एक्सपर्ट्स  विशेष गोष्टी सांगतही होते. फार कळत नसलं तरी सधन निसर्गसंपदा आणि थंड हवा सुखावून टाकत होती. वळणा वळणाच्या , चढणीच्या घाट  रस्त्याने आपला हिसका काहींना दाखवलाही, पण ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ पासून ‘उठे सबके कदम पर्यंत’ आणि ‘ तुझी चाल तुरुतुरु’ पासून  ‘गगन सदन तेजोमय’ पर्यंत वेगवेगळ्या पट्टीतल्या गाण्यांचं आव्हान पेलण्यातला आनंद जास्त मोठा होता.

आता जवळ आलं चक्राता. लष्करी छावण्यांमुळे नावारुपाला आलेलं चक्राता एकाच टप्प्यात भौगोलिक वैविध्य दाखवणारं असल्यामुळे अभ्यासकांच्या आवडीचं.  वर्षानुवर्ष येणाऱ्या केतकी, मानसी सारख्या तज्ञांना जीवाभावाचं वाटणारं आणि गोळे सर  आणि मॅडमसाठी तर जन्मजन्मांतरीचं नातं सांगणारं. आमच्यासारख्या नवख्यांनाही ते आपुलकीने बरंच काही सांगेल असा विश्वास आहे.

किमोना हिमालयन रिसॉर्ट आमची वाट पाहत होतंच. केतकी, मानसी, गुरुदास, अजय यांच्याकडून लेक्चर्स मधे बरंच काही शिकलो होतोच. आता तर जवाहिऱ्याच्या उत्साहाने ते निसर्गातील एकएक हिरा, जेम्स, दागिने आम्हाला दाखवतील यात काही शंका नव्हती. कुठल्याही बालिश प्रश्नाला ते ज्या प्रेमाने उत्तर देतात ते केवळ कमालीचं. कदाचित इथल्या पहाडांनी त्यांना तो शांतपणा दिला असावा.

आता असा शांतपणा अनुभवत पुढचे पाचसहा दिवस मस्त हिमालय की गोद में !

Looking forward 🙂

चक्राता सहल - दिवस तिसरा

(२०-ऑक्टो-२४)

य्ये! कॅम्प सुरु झाला !

 

काल हिमालय की गोदमे शांतपणा अनुभवायचा वगैरे म्हटलं खरं पण शांतपणे तंगड्या ताणून बसायला मी इथे आलेलो नाही हे माहित होतंच. आम्ही इथे अभ्यास करायला, शिकलेली थेअरी पडताळून बघायला आलो होतो. अर्थात सोबत भरपूर मजामस्ती करायला,  खळखळून हसायला पूर्ण परवानगी होती.  त्यामुळे कॅम्प भारी होणार ह्याची खात्रीच होती. आणि मी कितीही म्हटलं असतं तरी आमचे इकॉलॉजीचे मेंटॉर्स इतके उत्साही आहेत की त्यांनी आमच्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज प्लान करुन ठेवल्या होत्या.

दिवस उजाडला आणि आम्ही आलोय हे पक्ष्यांना दाखवायला आम्ही डेकवर जाऊन उभे राहिलो. मग काही पक्षी लाजतमुरकत, काही धिटाईने आम्हाला बघून गेले. काहीजणांचा ॲटीट्यूड मात्र आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन त्यांच्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज सुरु ठेवायचा होता. मग आम्हीही त्यांना बघायला सुरवात केली.

केतकी, मानसी, केदार आणि आणखी काहीजणं जे पक्षी साध्या डोळ्यांनी बघत होते ते आम्हाला दुर्बिणीतूनही दिसत नव्हते. त्यांनी सांगितल्या ठिकाणी आम्ही दुर्बीण रोखून फोकस करेपर्यंत ते उडून जात होते. आमच्यातली तज्ञ मंडळी त्यांना  Russet sparrow,  Verditer fly catcher, Red billed blue magpie, Kalij, Griffin vulture, Laughing thrush,  Blue whistling thrush, Black headed Jay,  Barbet, Minivet वगैरे म्हणत होते. माझ्यासारखे फक्त त्यांचं सौंदर्य न्याहाळत होते. त्यांचे रंग, आकार, आवाज, त्यांची चंचलता मोहवून टाकत होती. इतके लाजरे पक्षी, पण आमचं काळीज कधी घेऊन गेले कळलंच नाही. रोज सकाळी भेटायचं promise पक्ष्यांकडून घेऊन आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो.

बिट्टूजी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफनी आमचं वजन किमान दोन किलोनी वाढवायचं मिशन हाती घेतलं असल्यामुळे आम्हीही त्यांना actively support करत होतो. एवढं मस्त, चवीचं बनवणाऱ्यांना वाईट वाटू नये याची काळजी घेणं हे आमचं कर्तव्यच होतं.

कॅम्पचा पहिलाच दिवस असल्यामुळे आज कुठे फार चढाई वगैरे करायची नव्हती. गाडीत बसायचं, फॉरेस्ट गेस्ट हाऊसला जायचं, काही झाडं बघायची आणि जेवायला परत यायचं, इतकंच. आता ह्या इतकंच मध्ये आम्ही इतकं काही बघितलं की तेवढं जरी लक्षात राहिलं तरी गोल्ड मेडल मिळाल्याचा आनंद होईल. अर्थात गोल्ड मेडलसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे माहित असल्यामुळे मला सोनं अजिबात आवडत नाही असं मी मनातल्या मनात डिक्लेअर करुन टाकलं. नावांचं फारसं टेन्शन न घेता मस्त आनंद घ्यायचा हे ठरवलं आणि भंजाळून गेलेल्या डोक्याला शांतता मिळाली.

Pine, Deodar, Fir, Spruce, Oak , Rhododendron ह्या इथल्या dominant species. Pine, deodar, fir, spruce हे conifers तसेच Baan, Moru, Kharasu  ह्या Oak मधल्या जाती पुढचे काही दिवस रोज दिसणार आहेत असं समजलं. पक्ष्यांकडे आम्ही प्रेमाने बघत होतं. झाडं आमच्याकडे मायेने बघत होती. The giving tree मधल्या झाडाकडे मी आज आयुष्याचा अर्थ विचारायला आलो होतो. त्याने फांद्या सळसळवून वाऱ्याची एक झुळूक माझ्याकडे पाठवली. मला कळलं, आयुष्य म्हणजे वाऱ्याची हलकी झुळूक.

डॉमिनंट मोठी झाडं ही इतकीच असं सांगितल्यावर हायसं वाटलेलं असतानाच Herbs, shrubs चा पेटारा केतकीने अगदी थोडासा उघडला. विंचवाच्या दंशाची आठवण करुन देणारं बिच्छू, त्याच्यावरचा उतारा असलेलं जंगली पालक उर्फ खरांश. बॅबलरचं खास आवडतं कश्मोई उर्फ दारुहरिद्रा, प्रिन्सिपिया उर्फ बेकोई, बुरांश उर्फ संतानक उर्फ र्होडेडेड्रॉन वगैरे वगैरे. ह्या Rhododendron ची फुलं फार सुंदर असतात. आत्ता त्याला फुलं नव्हती.

डोक्याला फारसा ताप घ्यायचा नाही असं ठरवून सुद्धा blue pine ,cheer pine , cupressus, endemic झालेला mahonia, आणि आधी ऐकलेली एवढी सगळी नावं ऐकून दमायला झालंच . Pine Deodar Fir Spruce च्या खेळामध्ये जेव्हा हात वर खाली करताना तारांबळ उडत होती तेव्हा भरपूर हसलो. मजा आली.

सेकंड हाफमध्ये शहरी माणसांचं आवडतं काम करायचं होतं. मार्केट व्हिजिट. चक्राता मार्केटला जाऊन खरेदी करणे आणि वेगवेगळ्या परस्पेक्टीव्हने मार्केटचा अभ्यास करणे असा एकूण प्लान होता. त्यातला खरेदी करणे हा भाग तर सोपाच होता. तो आम्ही व्यवस्थित केला. नंतर वेगवेगळ्या दुकानात जाऊन लोकांशी बोलणे, गावाची economy, तिथे विकल्या जाणाऱ्या वस्तू, सर्विसेस समजून घेणे, आधुनिक जीवनशैलीचा, पर्यटकांचा, क्लायमेट चेंज चा त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम झाला आहे हे समजून घेणे अशा अनेक गोष्टी करायच्या होत्या.

वेगवेगळे ग्रुप करुन आम्ही दुकानदारांना भेटलो. ते सगळे एवढे मोकळेढाकळे, open minded होते की आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला न मागताच मिळत होती. इकॉलॉजिकल सोसायटीने इतक्या वर्षात कमावलेल्या विश्वासाचा तो परिणाम होता. वेगवेगळ्या दुकानदारांकडून काही उत्तरं सारखी तर काही  contradictory येत होती. पण प्रत्येक दुकानदारांच्या आर्थिक,  सामाजिक स्तराप्रमाणे वेगवेगळी उत्तरं येणं साहजिकच होतं. रस्ता झाल्यामुळे चक्रातामधला व्यापार कमी होणं, पुढची पिढी चक्रातात रहायला तयार नसणं, चक्राताचा व्यापार मुख्यत्वे मिलिटरी ओरिएंटेड असणं, पर्यटन हे अजूनतरी मुख्य driver नसणं, पण खाण्यापिण्याच्या शहरी सवयींविषयी क्रेझ असणं अशा अनेक गोष्टी जाणवल्या. 

जेवण झाल्यावर आज काय बघितलं हे शेअर करायचं हे सेशन झालं. मग उद्या काय करायचंय ते सांगून झाल्यावर गप्पा मारायला, झोपायला मुभा होती. पण आमच्या फ्लोरा ग्रुपच्या लिडर्स एकदम उत्साही. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच आम्हाला पालेभाजी निवडायला बसवलं. एकतर झाडं हलत नाहीत, त्यामुळे त्यांचे फोटोबिटो काढता येतील या एकमेव कारणाने मी फ्लोरा मधे नाव टाकलं होतं. घरी पालेभाजी निवडायची मला सवय आहे, पण ती सगळी एका speciesची पानं असतात.  इथे प्रत्येक पान वेगळं. निसर्गात एवढी विविधता का बरं असते असा माझ्या मनातला झोपाळू विचार बाजूला सारून मी इतर उत्साही स्टुडंट्ससोबत काहीबाही करत रहायचो आणि कधी एकदा कोणीतरी गुडनाईट बोलतंय याची वाट बघत बसायचो.

  

चक्राता सहल - दिवस चौथा

(२१-ऑक्टो-२४)

देवबन - व्यास शिखर, खडांबा

 

सकाळचे साडेपाच वाजले होते. काळोखाचा पडदा हळूहळू बाजूला सारत पर्वतरांगा आपले रौद्र सौंदर्य दाखवू लागल्या होत्या. आपण सह्याद्रीत भटकणारी माणसं. सह्याद्रीही भव्य दिव्य आहे, खडबडीत, काळा सावळा. पण त्याच्या अंगाखांद्यावर खेळल्यामुळे तो मला विठोबासारखा प्रेमळ वाटतो.  लेकुरवाळा. इथल्या पर्वतरांगांची ठेवणच वेगळी आहे. उंचच उंच मातीचे ढिगारे असलेला हिमालय मला  पांढरे भस्म लावलेल्या शंकरासारखा वाटतो. दरारा वाटावं असं त्याचं व्यक्तिमत्त्व. भोळा आहे पण लहरीही. लहान बाळासारखं लाडाने त्याच्या कुशीत शिरलं तो  त्याचं सगळं सौंदर्य दाखवेल असा भोळा. पण कधी कोपेल ते सांगताही येणार नाही.

चक्राता.समुद्रसपाटीपासून  तब्बल दोन हजार एकशे मीटरहून अधिक उंचावर पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. आजूबाजूच्या बर्‍याच गावांशी जोडलेलं व्यापारी केंद्र असलेलं, ब्रिटिशकाळापासून लष्कराच्या छावणी आणि सैनिकांच्या ट्रेनिंगसाठीचं महत्वाचं ठाणं.  भौगोलिक वैशिष्ट्यावर (geographical features) आधारित अभ्यासकांनी  भारतातील हिमालयाचे  तराई, शिवालीक,  मिडल हिमालय आणि  ग्रेट हिमालय  असे भाग केले आहेत.  चक्राता अशा खास जागी वसलेलं आहे की तिथून थोड्याच अंतरावर मिडल हिमालय संपतो आणि ग्रेट हिमालय सुरु होतो. इकॉलॉजिकल सोसायटीच्या या स्टडी टूरमध्ये चक्रातात राहून वेगवेगळे हॅबिटाट बघण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. आणि तेही गोळे मॅडम, केतकी, मानसी, गुरुदास, अजय आणि केदारसारख्या अतिशय उत्साही, प्रेमळ तज्ञांच्या आणि वीस ते सत्तरच्या तरुणाईची सोबत! कसली भारी मजा आहे ना!

काल काळीज दिलेल्या पक्ष्यांशी प्रियाराधन करुन आम्ही देवबनला जायला निघालो. आज आपण छोटा ट्रेक करणार आहोत असं आम्हाला सांगितलं होतं. भितीवर मात करण्यासाठी ट्रेक्स करावेत असं म्हणतात. इथे तर ट्रेक सुरु होईपर्यंतचा रस्ता चांगलाच adventurous होता. या रस्त्यावरुन आम्हाला आजूबाजूच्या झाडांची,  पक्ष्यांची माहिती सांगत ड्रायव्हर्स सफाईने गाडी चालवत होते. चढणीचा दगडगोट्यांचा रस्ता, एका बाजूला दरी आणि त्यातून होडीसारखी हलणारी गाडी चालवताना आम्हाला तिथल्या खास चिजा दाखवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या ड्रायव्हर्स बद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. Hats off to them🫡🫡 

लष्कराच्या नवीन जॉइन झालेल्या जवानांना  रॉक क्लायम्बिंग आणि इतर ट्रेनिंग देणाऱ्या कॅम्पला हात दाखवत आम्ही पुढे निघालो.  Woodpecker, Eurasian Jay, nut cracker, Himalayan griffon vulture, whistling thrush अशा अनेक पक्ष्यांचं सौंदर्य मनात साठवत, दगडांना वेढून टाकणारी मकरंडा उर्फ पत्थरजड, कश्मोई, बेकोई, चश्नोई, जंगली अजवाईन, बर्बेरीज अशी झुडुपं, देवदार, चीड पाईन, फर, बानसारखी मोठी झाडं बघत, त्यांचे औषधी आणि रोजच्या वापरातील उपयोग ऐकत आम्ही 'कौन्तायनी पैदल ट्रेक' पर्यंत आलो.

हिमालयावर महाभारतातील व्यक्तिरेखांचा अमीट ठसा आहे. कुन्तीपुत्रही या ट्रेकवरुन चालले असतील का असा विचार करत पुढे निघालो. चढणीचा, मस्त मस्त जंगलातला ट्रेक सुरु झाला. काल शिकलेल्या डाॅमिनंट स्पेसीज दिसायला लागल्या. देवदारची उंच उंच झाडं आणि  सुरुवातीला देवदारची आणि बान ओकची उंच उंच झाडं. देवदार, फर्न, स्प्रुस करत करत जसजसं आपण उंचावर जात राहू तसतसं इथलं जंगल ब्राॅड लिव्हड बान, बानपासनं मोरु आणि मोरुपासून खरसूमधे बदलत गेलेलं आपल्याला दिसतं. फाॅरेस्ट ऑफिसने जतन केलेल्या या जंगलात पाताळापासून आकाशापर्यंत पोचलेले वृक्ष ते र्होडेडेड्राॅन ते मकरंदा ते वाईल्ड स्ट्राॅबेरी आणि अगदी लायकेन पर्यंतची अतिशय समृद्ध जिविधता पहायला मिळते.  एवढ्या वैविध्यात  झाडावरचे  माॅस आपलं मायक्रोक्लायमेट जपत असलेलं बघितलं.

देवदारच्या झाडावर ती किती वर्षांची आहेत ते लिहीलेलं. देवदारची झाडं खूप जगतात. इथली काही झाडं तर शे दिडशेवर्षांहून जुनी. मी माझ्या पणजोबांना बघितलं नाही. पण जर ते इथे आले असतील तर ह्या झाडांनी त्यांना बघितलं असेल. जर माझी नातवंड किंवा पतवंड इथे आली तर मी चढताना किती दमलो होतो हे ही झाडं त्यांना हसून सांगतील असा विचार मनात आला आणि मी जरा जास्त जोर लावून चढायला लागलो. पायांना वेग आला आणि लवकरच नऊ हजार चारशे फुटावरच्या व्यास शिखरावर पोचलो.

व्यास शिखर हे देवबनमधील सर्वात उंच ठिकाण. व्यासांनी इथे बसून महाभारत लिहिलं अशी वदंता आहे. व्यासांसारखा प्रतिभावान कवी, देवबनासारख्या निबिड जंगलातील शिखर आणि समोर  बेलाग हिमालय.  सगळ्यात उंच कोण असा प्रश्न पडला आणि शेवटी शिखराला व्यास शिखर म्हटलं जाऊ लागलं. शिखरावर आम्ही पोचलो तेव्हा एका पाठोपाठ एक असलेल्या पर्वतरांगा  अतिशय सुंदर दिसत होत्या पण कान्डमहादेवपासून नंदादेवीपर्यंतची हिमशिखरं मात्र दिसत नव्हती. त्याबाबतीत आमचा धृतराष्ट्र झाला होता. मदतीला संजय म्हणून मोबाईलमधले ॲप कामाला आलं आणि हिमशिखरांचं व्हर्च्युअल दर्शन घेऊन आम्ही समाधान मानून घेतलं.

आता इथून आम्ही खडंबाला जायला निघालो. पुन्हा तो ॲडव्हेंचरस रस्ता. मध्ये एका ठिकाणी रस्त्यातला अर्धा भाग खचला होता आणि उरलेल्या अगदी थोड्या भागातून ड्रायव्हरने स्कीलफुली गाडी काढली. थोडंसंच पुढे रस्त्यावर एक चबुतरा सारखं छोटंसं स्मारक दिसलं. अपघातग्रस्त जवानाचं. रारंगढांग कादंबरीतलं ' आदमी जब मर जाता है तो क्या रहता है, बस उसकी यादगारी' हे वाक्य आठवलं आणि थोडा वेळ फक्त शांत राहिलो.

आता इथून आम्ही खडंबाला आम्ही चाललो होतो. हिमालयाच्या राॅक फाॅर्मेशनचे प्रकार बघायला.  Indian tectonic plate Eurasian plate एकमेकांवर आदळत राहिल्यामुळे तयार झालेला घडीसारखा हिमालय आपल्या सह्याद्रीच्या मानाने तरुण पर्वत.  ह्या कोलिजनच्या वेळेस तिथल्या समुद्रातील क्रस्ट वर येऊन हिमालय तयार झालाय.  त्यामुळे त्याची ठेवण सह्याद्रीहून खूप वेगळी आहे. खडांबाला ह्या दगडांचे आडवे, तिरपे असे वेगवेगळे फाॅर्म बघायला मिळतात.

तिथे अगदी छोट्याशा पॅचमध्ये राहिलेलं ephedra (सोमलता) हे endangered गवत बघितलं. आणि  बघितला पालीच्या जातीतला एक सुंदर  प्राणी. अगामा.

कडेकपारीत राहणारे अगामा उन्हाने अंग शेकायला येऊन बसतात तेव्हा त्यांच्या त्वचेची निळसर छटा आणि पाठीवरील पॅटर्न बघत राहण्याजोगा.  छोट्या मोठ्या किड्यांना खाणारे अगदी छोट्या पालीपासून सरड्याहून मोठे अशा वेगवेगळ्या आकाराचे अगामा, त्यांना खाणारे  step eagle, scavenger Himalayan vulture, Griffen vulture, Krestal,  Bearded vulture, यासारखे पक्षी,   दगडांवर उगवलेले cotton easter,  आणि सुंदर निळी फुलं बघण्यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही.

अशा प्रकारे आमचा  कॅम्पचा दुसरा दिवस फ्लोरा,  फॉना आणि लँडस्केप ग्रुप साठी भरपूर नवीन गोष्टी शिकवणारा ठरला. अर्थात Socio cultural ग्रुप इतका हुशार होता की या प्रत्येक ठिकाणी त्यांनीही बरंच नॉलेज गोळा केलं होतंच. 

 

चक्राता सहल - पाचवा दिवस  

(२२-ऑक्टो-२४)

मोइला टॉप, कनासर

 

इकॉलॉजिकल सोसायटीचे आम्ही सगळे विद्यार्थी. पुण्यात क्लासच्या  वेळी भेटतो, बोलतो. पण शहरी सवयीमुळे बहुतेक सगळ्यांनी स्वतःला घड्याळाला बांधून घेतलंय. त्यामुळे तसं वरवरचं बोलणंच होत असतं. इथेही घड्याळ आहे, टाईट शेड्युल आहे, आम्ही चक्क अभ्यास वगैरेही करतोय. पण त्याचबरोबर खूप गप्पा, धमालमस्ती करतोय. भरपूर हसतोय आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एकमेकांना समजून घेतोय. माझ्या अवतीभवती एवढी भन्नाट माणसं आहेत की चक्रातातल्या शुद्ध हवेबरोबर पाॅझिटिव्ह एनर्जीही मिळतेय. किंचीतसा वेळ स्वतःसाठीही काढतोय मी. भवताल समजून घेताना मला मीही थोडा जास्त कळू लागलोय आणि माझ्या आत डोकावल्यावर माझं भवतालावरचं प्रेमही वाढतंय. खूप काही साठवणं चालू आहे आत.

आज आम्ही मोइला टॉपला चाललो आहोत. आजचा ट्रेक कालच्यापेक्षा जास्त मोठा, जास्त चढणीचा. ES  केवढी काळजी घेतायत आमची. आमच्या नकळत उंच उडीचा बार वरवर नेला जातोय. आपल्याला नाहीच जमणार असं वाटणार्‍या काहींना अरे नक्की जमेल असा विश्वास देत त्यांचा confidence वाढवत त्यांना सामावून घेतलं जातंय.

गाडीतून जाताना  बाहेर बघत राहणं, नवीन दिसलेले पक्षी, प्राणी, लँडस्केप टिपत राहणं, न समजलेल्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणालाही विचारत राहणं आता जमायला लागलंय. मोठेपणाचं आवरण गळून पडलंय. तरुण मित्र मैत्रिणींकडून खूप शिकायला मिळतंय आणि जे जे मिळतंय ते सगळं मी विनासंकोच घेतोय. थोडा थोडा का होईना,  पण बदलतोय मी. निसर्गात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेल्या माणसांमध्ये आपल्याला बदलण्याची केवढी ताकद असते! Unlearn आणि relearn करण्याचा seriously प्रयत्न करतोय मी. आणि हे सगळं करताना हसण्या खिदळण्यात अजिबात खंड नाही हे विशेष.

आम्ही लोखंडी किंवा लोहारी या गावातून पुढे चाललोय. आजूबाजूला उंच खडकाळ डोंगर. या खडकात लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यात लालसर चॉकलेटी छटा दिसतात. चक्राता परिसरातील पहिला स्नोफाॅल इकडे होतो असं ड्रायव्हरकडून कळलं. त्यामुळे या डोंगरावर झाडं नाहीत. सगळीकडे खुरटं गवत आणि त्यावर फुललेली अतिसुंदर रंगीबेरंगी फुलं. गंमत म्हणजे लोहाच्या डोंगराच्या जस्ट पुढे कोळशाचे डोंगर. निसर्गात geographical timescale मधे प्रचंड उलथापालथ होत असते.  समुद्रातून हिमालयासारखे पर्वत बाहेर येतात,  पृथ्वीवर राज्य करणारे डायनॉसोर गायब होतात.आपण कल्पनाही करु शकत नाही अशा घटना घडत असतात. त्यातूनच कधी भौगोलिक रुपं बदलतात, कधी हॅबिटाट बदलतात आणि जीवजंतूंपासून अवाढव्य डायनोसोरपर्यंत प्रत्येकजण एकतर स्वतःला बदलून टिकतात किंवा नष्ट होतात. माणसाने कितीही अंग फुगवलं तरी निसर्गासमोर आपण अगदीच किरकोळ आहोत हे नेहमीच लक्षात ठेवायला हवं हे अशा ठिकाणी प्रकर्षानं जाणवतं.

हं, तर काय म्हणत होतो, एकदम अचानक कोळशाचा डोंगर दिसला. "यात हिराही मिळू शकेल, पण तो हिरा मिळवण्यासाठी खोदकाम करायला नको. आमचा निसर्ग हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे." आमचे ड्रायव्हर दिनेशजी सांगत होते. ES चं सार त्यांनी चांगलंच आत्मसात केलेलं दिसत होतं.

आम्ही मोइला टॉपच्या बेसला आलो. आता इथून दोन अडीच किलोमीटर चढायचं होतं. हा ट्रेक अतिशय सुंदर. देवदारच्या जंगलातून सगळा समृद्ध निसर्ग डोळ्यात भरुन घेत चालायला भरपूर वेळ लागत होता. पण इथे घाई कोणाला होती? पक्ष्यांची किलबिल,  देवदारच्या डिंकाचा गंध, त्वचेला सुखावणारा गारवा, डोळे भरुन टाकणारी जिविधता आणि दर थोड्या वेळाने थांबून  कुणाच्या ना कुणाच्या सॅकमधून बाहेर येणारे चविष्ट च्याउम्याउ.  या सर्वात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोबत शेकडो वर्ष जुने देवदार नावाचे  जमिनीत पाय रोवून उभे असलेले ऑक्सिजन पार्लर्स! सगळे सेन्सेस तृप्त होत असताना कोण कशाला घाई करेल?

तरीही शेवटी पोचलोच आम्ही मोइला टॉपला.  लाईमस्टोनसारखे  विरघळणारे द्राव्य जेव्हा खडकात जास्त प्रमाणात असतात तेव्हा तिथे लाखो वर्षात केव्हज किंवा सिंक तयार होतात. या भूवैशिष्ट्याला karst topography म्हणतात. ह्या भागाला हिंदीत बुग्याल असेही म्हणतात. बुग्याल म्हणजे तीन हजार ते चार हजार पाचशे मीटर उंचीवरवरचे  अल्पाईन गवताळ कुरण. आजूबाजूला मखमली टेकड्या. वेगळीच जादू आहे इथल्या निसर्गात. हिरवेगार कुरण बघताच आधी आपण मंत्रमुग्ध  होऊन जातो आणि थोड्याच वेळात डोळे निवून जातात. अजून महिन्याभरात इथे स्नोफॉल सुरु होईल आणि निसर्ग नावाचा जादूगार हिरवा रंग पुसून पांढऱ्याशुभ्र रंगाचा कुंचला हातात घेईल.

त्यातल्या एका टेकडीवर परीचं देऊळ आहे. आजूबाजूच्या परिसराचं रक्षण करणारी भूदेवताच म्हणता येईल तिला. पशुपालक गुज्जर समाजातली लोकं उन्हाळ्यात आपली गायीगुरं घेऊन इकडे येतात. झोपड्या करुन इथे राहतात. थंडी सुरु झाली की आपल्या कमी उंचीवरच्या गावांना परततात. ही परी आपल्या गायींचं रक्षण करते अशी त्यांची श्रद्धा आहे.

इथलं मुख्य आकर्षण म्हणजे बुधेर केव्हज. इथल्या खडकात आणि मातीत खूप मोठ्या प्रमाणात limestone salts आणि  minerals आहेत. लाखो वर्षांच्या पावसाने limestone  विरघळून  आणि खडक झिजून caves तयार झाल्या आहेत. पावसाच्या पाण्यात हवेतला कार्बन डायऑक्साईड विरघळून  अगदी हलकं ॲसीड तयार होतं. या पाण्यामुळे हळूहळू caves मधील दगडातील सगळे क्षार खडकाच्या अगदी बाहेरच्या कडेपर्यंत येतात. तिथेच थांबतात. Evaporation नी त्यातलं पाणी उडून जातं. क्षारांचा स्तंभ, लवणस्तंभ (stalactite)तयार होऊ लागतो.  ज्यावेळेस पाण्याचा जोर जास्त असतो तेव्हा हे क्षारयुक्त पाणी खाली पडतं. खाली पडलेल्या पाण्याची वाफ होऊन खालून वर स्तंभ (Stalagmite) बनू लागतात. काही ठिकाणी बेसाॅल्ट खडक झिजून सुंदर आकार तयार होतात. क्लासमध्ये आणि काल संध्याकाळी गोळे मॅडमनी घेतलेल्या सेशनमध्ये थेअरी शिकलो होतो. आता प्रत्यक्ष बघायची वेळ आली होती.

जिथे या केव्हज आहेत तिथे बघून आत काय असेल याची जराही कल्पना येत नाही. डोंगरावरचा एखादा खडबडीत दगड उचलावा , सहज त्याची लपलेली बाजू बघायला जावं आणि लखलखत्या क्रिस्टलनी डोळे दिपून जावेत अशी परिस्थिती इथेही झाली. आम्ही पुण्यातून येताना रेनकोट, हेडटॉर्च असा खास जामानिमा घेऊन आलो होतो. अजय सर, केदार आणि रमझान सहाजणांच्या पहिल्या फळीला घेऊन आत गेले.  इतक्या थंडीत ते तिघेजण सगळ्या ग्रुपचं बघून होईपर्यंत तिथेच थांबणार होते. पंधरा वीस मिनीटं झाली तरी कोणी बाहेर येईना. उत्सुकता ताणली गेली.  तेवढ्यात पहिली फळी बाहेर आली. त्यांचे बाहेर पडतानाचे  उजळलेले चेहरे बघून उत्साहात आम्ही आत शिरलो.

आत मिट्ट काळोख.  ओल, निसरडे भाग. काही ठिकाणी इतकी कमी जागा होती की अगदी सरपटतही जावं लागत होतं.थंडगार हवा. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं जाणवत होतं. एकट्या दुकट्याने जायला रिस्की वाटावं अशी परिस्थिती होती. रमझान मधल्या भागात उभा राहून गाईड करत होता. दगडांचे विविध आकार, काही पाण्याने कोरलेले, काही पाण्यात विरघळून तयार झालेले. पुढे चाळीस फूट खोल दरी. Stalactite, Stalagmite कसे तयार होतात, हा चमत्कार कसा घडतो हे अजय सरांनी पुन्हा एकदा सांगितलं. लवणस्तंभांचे आकार नजरेत भरुन घेतले. सगळ्यांनी टॉर्च बंद केले. काजळासारखा मिट्ट काळोख. निरव शांतता. डोळे न मिटताच शरीरावरील सगळ्या संवेदनांचा अनुभव घेत काही मिनीटं विपश्यना केली. निसर्गापुढे नतमस्तक होत आतली शांतता अनुभवली.  रमझानने दाखवलेला लाईट अँड साउंड शो बघितला. इतके भारावून गेलो होतो की या तिघांना थॅन्क्स न म्हणताच पुढल्या फळीला आत येऊ देण्यासाठी बाहेर पडलो.

सगळ्यांनी हा भारावून टाकणारा अनुभव घेऊन झाल्यावर आम्ही मोईला टॉपवरुन उतरायला सुरुवात केली. चालता चालता  पुन्हा एकदा सिंकहोल्सकडे  नजर टाकली.  हे सिंकहोल्स म्हणजे भावी केव्हज. अजून मिलियन एक वर्षांनी जेव्हा ES ची बॅच इकडे येईल तेव्हा त्यांना त्या जागी अनेक सुंदर केव्हज दिसतील.

जेवण आटपून आम्ही कनासरला  जायला निघालो.

कनासरला माझ्या खापर खापर खापर खापर खापर पणजोबांच्या वयाचे दोन देवदार वृक्ष आहेत. अवघे दोनशे ऐंशी किंवा त्याहून जास्त वयाचे हे बुजूर्ग. तब्बल पाचशे अठरा सेमी आणि सहाशे अठ्ठेचाळीस सेमी परीघ असलेलं कमावलेलं शरीर असलेले. सहासात जणांनी एकत्र मिठी मारून आम्ही त्यांच्याविषयीचा आमचा आदर व्यक्त केला. बाजूच्या एका बोर्डवर त्यांनी माणसांना उद्देशून त्यांचं मनोगत लिहिलंय. त्यात माणसांना सुखसमृद्धीसाठी शुभेच्छा देताना त्यांनी निसर्गातल्या सगळ्यात जीवांची काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. कळकळीने केलेल्या ह्या आवाहनाला आपण सगळ्यांनी नक्कीच प्रतिसाद द्यायला हवा.

या दोन देवदारांची नवीन पिढी कनासरच्या सगळ्या परिसरात पसरली आहे. तिथे सहा ग्रुप करुन आम्ही quadrat activity  केली. एखाद्या habitat मध्ये कुठले प्राणी किंवा झाडं आहेत याचा सर्वे करण्यासाठी sample म्हणून randomly एक मीटर बाय एक मीटरचे तुकडे केले जातात. ह्या तुकड्याचा अभ्यास करुन एकूण परिसरातील dominant species चा अंदाज घेतला जातो. इथे सगळंच प्रकरण अवाढव्य असल्यामुळे आम्ही प्रत्येक ग्रुपने दहा बाय दहा मीटरचे तुकडे घेतले. त्या तुकड्यातली मोठी झाडं, झुडुपं आणि झाडोरा यांचा अभ्यास केला. मोठ्या झाडांचा परीघ मोजला. झुडूपांचा आकडा मोजला. झाडोरा किती आहे याचाही काऊंट घेतला. या माहितीचा उपयोग करुन आम्हाला तेवढ्या भागातील वनस्पतींचा बायोमास काढायचा होता. ते काम आम्ही हाॅटेलला गेल्यावर करणार होतो.  एक जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त समीकरण वापरुन आम्ही हा बायोमास आणि ह्या झाडांनी वातावरणातील किती कार्बन शोषून घेतला आहे याचा अंदाज घेतला. आमच्या ग्रुपने केलेल्या quadrat  मधील झाडांनी चक्क दहा टनाचा कार्बन साठवून ठेवला होता. खूप कृतज्ञता वाटली या झाडांविषयी. किती किती करतात ते आपल्यासाठी !

मी या विषयात अजून खूपच नवखा आहे. पण  थोडा अभ्यास करुन मी आणि माझ्या कुटुंबाने वातावरणात आजवर  किती कार्बन सोडला आहे, अजून किती सोडणार आहे याचा अंदाज घ्यायचा मी प्लान करतोय. किमान तेवढी झाडं लावून पृथ्वीच्या ऋणातून किंचीत तरी मुक्त होता आलं तर किती बरं होईल असा विचार मनात आला. कुणीतरी म्हटलंय, निसर्ग हा आपल्याला पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेला नसतो. आपण आपल्या मुला बाळांकडून तो कर्जाने घेतलेला असतो. निदान माझं कर्ज आणि त्यावरचं व्याज हप्त्या हप्त्यात जरी मी फेडू शकलो तरी माझ्या  मुलाबाळांवर  मी जास्तीचा बोजा टाकत नसल्याचं समाधान मला मिळेल.

 

चक्राता सहल - सहावा दिवस

(२३-ऑक्टो-२४)

कन्दाड गावाला भेट

सकाळी काहींना पक्ष्यांच्या किलबिलाटाने, काहींना चहाच्या वासाने तर काहींना रुम पार्टनर दरवाजा उघडा ठेवून बाहेर पडल्याने जाग येते. काही जण भल्या पहाटेच्या (पहिल्या धारेच्या) गरम पाण्याने आणि काहीजण रात्री झोपायच्या आधी आंघोळ करतात. काहींना हा आपला आंघोळ न करण्याचा तिसरा की चौथा दिवस याबद्दल कन्फ्युजन असतं. आंघोळीच्या बाबतीत वेगवेगळी विचारसरणी असल्यामुळे प्रत्येकाला पुरेसा स्लॉट मिळतोय. बारीकसारीक फ्रिक्शन्स होऊन आता सगळ्यांची घडी व्यवस्थित बसली आहे.  एकमेकांचे कंगोरे कळायला लागले आहेत. इथे तर बहुतांश लोकांच्या आवडीनिवडी सारख्या. तरीही क्वचित का होईना काहीतरी गडबड होतेच. इतक्या कोलाहलांची आपली भारतीय लोकशाही कशी चालत असेल याचं आश्चर्यच वाटलं मला .

काल आमच्यापैकी काहीजण रिसॉर्टचे मालक बिट्टूजी यांचं घर बघून आले होते. आज सकाळी आम्ही आठ दहाजण त्यांचं टेकडीवरचं घर बघायला गेलो. त्यांच्या घरी जायचं म्हणजे छोटा ट्रेक करण्यासारखं होतं.  अशा चढणीवरुन त्यांचा स्टाफ सहजपणे दिवसातून अनेक वेळा खाली वर करत असतो.  घर परंपरागत आणि माॅडर्न लाइफस्टाइलचं फ्युजन होतं. उच्च प्रतीचं लाकूड वापरुन बांधलेलं, कलात्मक, उच्च अभिरुचीची साक्ष देणारं आणि आल्यागेल्याचं मनापासून स्वागत करणारं घर. बिट्टूजी सगळ्यांशी प्रेमाने बोलत होते. गावातल्या प्रथितयश डाॅक्टरांचा मुलगा असूनही आयुष्यात काय करायचं हे बिट्टूजींना कळत नव्हतं. इकॉलॉजिकल सोसायटीचे गोळे सर भेटले आणि आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. खूप गोष्टी नव्याने कळल्या. त्यातून स्फूर्ती घेऊन व्यवसायाला सस्टेनेबलीटीची जोड देत ते जी सर्विस चक्राता येथे देत आहेत ती खरोखर कौतुकास्पद आहे.

माणूस.  ज्ञानाच्या जोरावर निसर्गात मोठ्ठा बदल करण्याची ताकद असलेला निसर्गाच्या परस्परावलंबी साखळीची कमजोर कडी असलेला प्राणी. त्यामुळे सजीव सृष्टी आणि भवतालाचा परस्परसंबंध अभ्यासताना पर्यावरणावर सगळ्यात जास्त impact करणाऱ्या माणसाचा, तो कसा वागतो, त्यानी कसं वागायला हवं ह्याचा अभ्यास माझ्या मते सगळ्यात महत्वाचा. त्यामुळेच आजची आमची कन्दाड गावाची भेट आम्हाला खूप शिकवून जाणारी ठरणार आहे.

चाळीस एक घरं आणि साधारण  दोनशे लोकसंख्या असलेलं छोटंसं कन्दाड गाव नजरेत भरतं ते तिथल्या मोठमोठ्या जुन्या लाकडी घरांमुळे.  त्यातली काही घरं तर शंभर वर्षांहून जुनी आहेत. आमच्यातील आर्किटेक्ट मंडळी ती घरं बघूनच पुढे सरसावले. आम्ही त्या दुमजली, तीनमजली घरांचे वैशिष्ट्यपूर्ण आकार, दगडी स्लेटची छप्परं, आकर्षक रंग, इवल्या इवल्या खिडक्या हे बघत असताना आर्किटेक्ट्सना घरांची आतली रचना, घरांना तोलणाऱ्या भिंतींचा, खांबांचा बॅलन्स,  छपराचा उतार अशा गणिती गोष्टी खुणावत होत्या.

नेहमीसारखा पाचसहा जणांचा ग्रुप करुन आम्ही एकेका घरात शिरलो. Socio cultural group च्या हुशार मंडळींना आज भरपूर ऐवज मिळणार असल्यामुळे त्यांनी प्रत्येक ग्रुपमध्ये आपली माणसं पेरली होती. गावातील माणसं शहरी लोकांसमोर लगेच मोकळी होत नाहीत. इकॉलॉजिकल सोसायटीने मात्र इतक्या वर्षात त्यांचा विश्वास संपादन केला आहे, आदर आणि जिव्हाळा मिळवला आहे. त्यामुळे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला फार कष्ट न घेता मिळत होती.

आम्ही आमचे ड्रायव्हर दिनेशजींच्या बहिणीच्या घरी आलो. जौन्सारी भाषा बोलणाऱ्या इथल्या बहुतेक लोकांशी हिंदीतून संवाद साधता येतो. तीन मजली घरातली कपाटं, हाॅलवजा खोली, स्वयंपाकखोली, चूल,  तळघर या सगळ्यावर तिथल्या हवामानाचा परिणाम दिसत होता. अगदी कमीत कमी भांडी आणि इतर संसारोपयोगी वस्तू . मिनिमलीझमचा नमुना आमच्यासमोर होता. मात्र हे करताना पाहुण्यांच्या  सरबराईत कुठेही कमी नव्हती. बोलण्यात, वेळ देण्यात, पाहुणचार करण्यात हिशोब नव्हता.

आजूबाजूचं जंगल, वनसंपदा टिकवून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माफी नावाची लाकडं मिळवण्याची आगळीवेगळी पद्धत, झऱ्याचे पाणी गावात आणण्यासाठी वापरलेली योजना, बियाणं साठवण्याची पारंपारिक पद्धत, सेंद्रिय शेती कालानुसार होत चाललेला बदल, गावातील तंटे मिटवण्यासाठीची  सिस्टीम, लग्नसराई वैशिष्ट्य, समाजरचना असे वेगवेगळे विषय घेत घेत गप्पांची गाडी मुलंबाळं, त्यांचं शिक्षण, भविष्य, वातावरण बदल,  टिव्ही, मोबाईल, नवीन टेक्नॉलॉजी आणि आधुनिक जगाचा त्यांच्यावर होणारा परिणाम अशी वेगवेगळी स्टेशनं घेत फिरत राहिली.

शेती, पशुपालन हे मुख्य व्यवसाय असलेल्या या लोकांना त्यांच्या आगळ्या संस्कृतीचा, नैसर्गिक श्रीमंतीचा, समारंभ, लग्न, समाजरचना, चालीरीतींचा अभिमान आहे. मात्र पुढली भविष्यवेधी पिढी शिकून पुन्हा न परतण्यासाठी शहरात गेली आहे याची खंत त्यांच्या बोलण्यातून येत राहते. पिढ्यानपिढ्यांनी जे टिकवून ठेवलं त्याचं आता काय होणार याची चिंता ते करत असताना मला पुण्यात बंगल्यात एकेकटे राहणारे वृद्ध दिसू लागले. माणूस इथून तिथून सारखाच असतो हे पुन्हा जाणवलं.

समुद्रसपाटीपासून साडेसात हजारहून जास्त उंचीवर असल्यामुळे कन्दाडमध्ये वर्षातून तीन चार महिने बर्फ आणि सहा महिन्यांहून जास्त काळ कडाक्याची थंडी असते. या एक्सट्रीम  क्लायमेटशी जुळवून घेत त्यांनी त्यांचं जगणं आखलं आहे. त्यांचं जगणं निसर्गावर अवलंबून आहे आणि अगदी अलिकडचा काळ सोडला तर निसर्गाला न ओरबाडता ते जगत आले आहेत.  एवढ्या तीव्र वातावरणातही त्यांनी त्यांच्यातील ओलावा, हास्य टिकवून ठेवलं आहे. आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकता येऊ शकतं.  गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेले मटार खात खात कितीतरी वेळ आम्ही त्यांच्याबद्दलच बोलत होतो. छोटासा उताराचा ट्रेल करुन आम्ही हाॅटेलला आलो.

आजचा सहावा दिवस संपला. पण चक्रातात आल्यापासून रोज करत असलेल्या एका ॲक्टिव्हीटीबद्दल तर लिहायचंच राहिलं. चक्राताला पहिल्या दिवशी आम्ही पोचलो तेव्हा काळ्याभोर आकाशाने आमचं स्वागत केलं होतं. त्यानंतर रात्रीचं चांदण्या लगडलेलं आकाश बघण्याचं आमच्यापैकी अनेकांना वेड लागलं.  मीही रोज रात्री अर्धा तास तरी चांदण्यात फिरण्याचा परिपाठ सोडला नाही. स्वच्छ आकाश, लख्ख चांदणं, आणि लपेटून टाकणारी थंडी. "लहानपणी आमच्या गावातही असंच छान आकाश दिसायचं". आमच्यापैकी अनेकजण नॉस्टॅल्जिक होऊन बोलत होते. आज मात्र शहरी माणसाची अवस्था 'कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो' अशी झाली आहे. आता उद्या नदीत डुंबण्याची नाही पण धबधब्यात भिजण्याची संधी मिळणार आहे. फक्त पाणी चार पाच अंश सेल्सिअस तापमानाचं असेल इतकंच असं अजय सरांनी सांगितलं आणि हास्याचे  जोरदार फवारे उडाले.

आज रात्रीचा फेरफटका मारुन परत येताना लक्षात आलं, आता कॅम्पचा फक्त शेवटचा दिवस उरलाय. उद्याचा जंगल ट्रेल आणि टायगर फॉल्स बघितला की सहल संपलीच. घरची आठवण येत होतीच,  पण चक्रातातून परत जायचा दिवस जवळ येतोय याची जाणीव होऊन वाईटही वाटत होतं. चक्रातातून जाण्यापेक्षा घरच चक्राताला आणायचं का असा विचार मनात आला आणि प्रॅक्टिकल मनाला लगेच त्यातल्या अडचणी लक्षात आल्या.  मग ठरवलं, थोडं थोडं चक्राताच सोबत नेऊया.  काय काय सोबत नेता येईल बरं?

 

चक्राता सहल - दिवस सातवा

(२४-ऑक्टो-२४)

जंगल ट्रेल, टायगर फॉल्स

 

तसं तर उद्या सकाळपर्यंत आम्ही इथे असणार आहोत. बिट्टूजींची टीम उद्या नाश्ता केल्याशिवाय आम्हाला जाऊ देणार नाही. पण कितीही वाईट वाटत असलं तरी शेवटच्या दिवशी परतीचे वेध लागतातच. कोणाचा परतीचा प्रवास कसा आहे, कोण कोण एकत्र जाणार आहे याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एका मार्केट व्हिजिटने मन न भरलेले पुन्हा मार्केटला जाऊन घरच्यांसाठी काहीबाही घेऊन आलेले होते. आजचा दिवस फुल एंजॉय करायचा, काही कसर ठेवायची नाही असं सगळ्यांनी ठरवलं होतंच.

आज आम्ही एका प्रॉपर जंगलातून उतारावरून चालणार होतो. आजपर्यंत बहुतेक वेळा आम्ही चक्राताहून उंच ठिकाणी जातानाचे ट्रेक केले होते. आजचा ट्रेक उताराचा होता.त्यामुळे झाडं बदलणार होती, वेगळे प्राणी, पक्षी दिसणार होते. आज आम्ही डाक्रा व्हिलेजपासून टायगर फाॅल्सच्या थोडं आधीपर्यंत चालणार होतो. डाक्रा हे बलुचिस्तानहून आलेल्या कामगारांनी वसवलेलं गाव. ही मंडळी आजुबाजूच्या गावात कामासाठी जातात, पण राहत्या जागी त्यांनी आपलं वेगळेपण जपलं आहे. त्यामुळे कन्दाडपेक्षा त्यांची जीवनपद्धती वेगळी, घरं वेगळी आणि परसात लावलेली झाडंही वेगळी.

हा साधारण सहा सात किलोमीटरचा ट्रेक होता. पण ह्या ट्रेकमध्ये आम्ही निवांतपणे बघत बघत जाणार होतो.  बरेचदा ट्रेकर्स वेगाने एकमेकांशी चढाओढ करत भराभर चालतात. आमचा ॲटिट्यूड 'जाईन विचारीत रानफूला' असा होता. दिसणार्‍या प्रत्येक प्रकारच्या झाडाची, झुडुपाची, पानाची,  फुलाची, किड्याची, अळीची  पक्ष्याची ख्यालीखुशाली विचारायची, नावगाव विचारायचं, मधूनच एखाद्याला भिंगातून न्याहाळायचं असा एकूण प्लान होता. आम्हीच काय, आसपासची सगळी जंगलं अनेकदा पायाखाली घातलेले केतकी आणि मानसीही पहिल्यांदाच बघतोय अशा उत्साहात सगळीकडे थांबत होते.

डाक्रा गावाच्या एन्ट्रन्सलाच आम्हाला जंगली तंबाखू आणि तिमूर दिसले.  दात घासायला तिमूरच्या काड्या घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. पुढे Apricot, Baan,Wild Brinjal,Principia अशी झाडं बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो. झऱ्याच्या काठाने आम्ही थोडे पुढे गेलो तेव्हढ्यात मानसीने हाक मारली. तिच्या पारखी नजरेला बिच्छूच्या झाडातून निघणारे पिवळे परागकणांचे ढग दिसत होते. थोडा वेळ शांत बसल्यावर आम्हालाही हे एकामागोमाग जाणारे पिवळे ढग दिसू लागले. चक्राताला यायचं म्हणजे बिच्छू माहीत असायलाच हवं. पहिल्या दिवशी ज्यांच्याशी आमची ओळख करून दिली गेली असे बिच्छू म्हणजे खरोखर विंचूदंशाची आठवण करुन देणारे.  आमच्यापैकी अनेकांना त्यांनी प्रसाद दिला. तर या बिच्छूचे इतके पोलन आम्ही श्वासातून शरीरात घेतले की पुण्यात गेल्यावर 'आपुनसे पंगा नही लेनेका क्या' असं आत्मविश्वासाने म्हणता येईल असा विचार मनात आला.

Bohemia, Mohaniya , Pisumar, Wild rose अशा वेगवेगळ्या झाडांशी गप्पा मारत मारत आम्ही एका बानच्या झाडापाशी पोचलो.या झाडावरच्या बांडगूळांवर पक्षी आले होते.  ही बांडगूळं पक्की हुशार असतात. पक्षी ह्या बांडगुळावरची फळं खातात. पण त्याच्या बिया इतक्या चिकट असतात की त्या पक्ष्यांच्या चोचीलाच चिकटून राहतात. अस्वस्थ होऊन पक्षी आपल्या चोची बान झाडाच्या खोडावर आपटत राहतात. बिया खोडात शिरतात आणि नवीन जीवनचक्र सुरु होतं.  किती मनोरंजक आहेत ना ह्या गोष्टी ? निसर्गाकडे खूप गोष्टी आहेत आपल्याला सांगण्यासारख्या.  फक्त आपण कान, डोळे, डोकं अलर्ट ठेवलं पाहिजे. हळू चाललं पाहिजे आणि उत्सुकता कायम ठेवली पाहिजे. Go slow चा नारा आम्ही इतका मनावर घेतला होता की हे सहा सात किलोमीटर अंतर कापायला आम्हाला पाच तास लागले. झऱ्याच्या प्रवाहाच्या काठाकाठाने आम्ही एका पाणचक्कीपाशी आलो. पाण्याच्या वेगाचा वापर करुन , टर्बाइन फिरवून दळण दळलं जात होतं. पाणचक्की बघून आम्ही जेवलो आणि टायगर फल बघायला गेलो.

वाघासारख्या डरकाळ्या फोडणारा, रोरावणारा आवाज असल्यामुळे या धबधब्याचं नाव टायगर फॉल पडलं असावं.   पंच्याण्णव मीटर उंचीवरून डायरेक्ट कोसळणारा हा भारतातील सगळ्यात उंच धबधबा मानला जातो. थंडगार पाण्यात डोकं शेकवून घेण्याची हौस असणाऱ्यांनी या  धो धो कोसळणाऱ्या धारेचा अनुभव घेतला. आणखी एक भन्नाट अनुभव आमची वाट पाहत होता. जीपच्या टपावर बसून थंड वारा खात रारंगढांग कादंबरीत वर्णन केलेले कडे बघायला वेगळीच मजा आली. ‘चल छैय्या छैय्या’ सारखी गाणी म्हणत वेडेपणा करताना एक वेगळीच झिंग चढली होती.

कसलं ना कसलं वेड माणसाला हवंच. आमच्या रुममध्ये सतत म्युझिक चालू असायचं. या संगीताच्या वेडापासून ते पक्षी, झाडं, प्राणी,  किटक, दगड, पाणी, माणसं, शब्द, चित्र, शिल्प, काव्य, नृत्य, नाट्य... झिंग आणायला खूप ऑप्शन्स आहेत.  Just need to find what's your poison. मात्र एक खेळ पुढचे काही तास वेगळीच झिंग चढवणार आहे याची अनेकांना कल्पना नव्हती. 'कितने मच्छर मारे?' या दिगंतने आणलेल्या खेळाने अनेकांना वेड लावलं. वेड्यासारखे हसलो.  कदाचित तो कॅम्प संपल्याच्या दुःखावरचा उतारा असावा.

कन्क्ल्युडींग सेशनमध्ये  पुढे आलेला या कॅम्पने काय दिलं, इथून जाताना काय घेऊन जाणार हा प्रश्न स्वतःलाच विचारत आम्ही बॅग्ज पॅक करायला निघालो. चक्राताच्या आठवणींनी बॅगा गच्च भरल्या होत्या.

 

चक्राता सहल - दिवस आठवा

(२५-ऑक्टो-२४)

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो

 

आलाच आजचा दिवस.  बिट्टूजींच्या स्टाफचा निरोप घेण्यापूर्वी रोजच्याप्रमाणे पक्ष्यांना भेटणं आणि सकाळचं फिरणं झालं. पहिल्या दिवशी लाजरेबुजरे, नजरेसमोर उभे न राहणारे पक्षी नंतरच्या काही दिवसात माझा फोटो राहिला, माझा फोटो राहिला म्हणत समोर येत होते. आज त्यांच्या किलबिलाटातही कुठेतरी खिन्नता जाणवली. त्यांना परतभेटीचं आश्वासन दिल्यावर त्यापैकी काहींनी पुण्याला येऊन मीच तुम्हाला भेटतो असं सांगितलं आणि मी  आश्वस्त होऊन हॉटेलच्या बाहेर फिरायला निघालो. इतके दिवस 'आज तरी दिसला का आपलावाला व्हल्चर ?'असं मुलगा विचारत असलेला व्हल्चर  आजच्या शेवटच्या दिवशी दिसलाच.  हो तोच तो. आम्ही दीड वर्षांपूर्वी बघितलेल्या कपारीत तिथेच तशाच ध्यानस्थ स्थितीत बसलेला. मनापासून आनंद झाला त्याला बघून.

चक्राताहून निघालो आणि डेहराडूनच्या शहरी कोलाहलात येऊन पोहचलो. कधी नव्हे इतका त्रास झाला त्याचा. FRI सारखी ब्रिटिशकालीन देखणी इमारत बघून आनंद झाला पण फुलून गेलो नाही. आवारातील झाडांनी मनाला थोडा दिलासा दिला इतकंच. FRI मध्ये जंगलासंबंधीचं म्युझियम आहे. इंग्रजांचा ॲप्रोच जंगलांना कारखाने आणि झाडांना प्राॅडक्ट म्हणून बघायचा असला तरी त्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास कमालीचा. प्रत्येक ज्ञानशाखेत किती खोलवर अभ्यास केला जाऊ शकतो याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. आपल्याला अजून खूप शिकायचंय हे जाणवलं. एका सातशेहून जास्त वर्ष जुन्या झाडाच्या खोडाचं सेक्शन, त्यावर नोंदवलेली सनावली इतिहास ह्या पद्धतीनेही शिकवला जाऊ शकतो हे सांगून गेली. FRI मधून सगळ्यांना टाटा बाय बाय करुन बाहेर पडलो आणि सहल ऑफिशियली संपली.

इथे येताना काय काय तयारी केली होती. भरपूर प्लॅन्स आणि वस्तूंची जमवाजमव. पण आम्ही केलेल्या तयारीहून लेडीज ग्रुपची तयारी जास्तच extensive होती. त्यांना इथल्यापेक्षा तिथल्यांची तयारी करुन यायचं होतं. दिवाळी नजरेच्या टप्प्यात असताना घराबाहेर पडून ती उंबरठ्याच्या आसपास फिरकत असताना घरी परतायचं हे सगळ्यांसाठी सोपं नसणार. तरीही नेटाने आणि मोठ्या उत्साहाने तयारी करुन त्या इथे आल्या होत्या. कुटुंबाशिवाय इतक्या लांब येण्याचा काही जणांचा हा पहिलाच प्रसंग होता.

हिमालयाच्या परिसंस्थेत आमच्यापैकी अनेकजण आधी कधीही आले नव्हते. तरीही सगळ्यांशी हिमालय मोठ्या प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागला.  इवल्याश्या रसेट स्पॅरो आणि टिट्सपासून सर्पन्ट इगल आणि बिअर्डेड व्हल्चरपर्यंत, फर्नच्या इवल्याश्या पानावरच्या अतिसुंदर किटकापासून  उन्हात अंग शेकणाऱ्या अगामापर्यंत, कोळ्याच्या जाळीत  मोत्यासारखं  चमकणाऱ्या पाण्याच्या थेंबापासून टायगर फाॅल्सच्या पंच्याण्णव मीटर्सवरुन कोसळणाऱ्या प्रपातापर्यंत,समुद्राला बाजूला सारत पण त्यातल्या  छोट्या छोट्या शंख शिंपल्यांना उराशी बाळगत उभारलेल्या भूकवच (क्रस्ट) पासून  पाण्याच्या थेंबांनी दगड विरघळवून विलक्षण आकार बनलेल्या लवणस्तंभांपर्यंत, भिंगातून बघितल्यावर एक अद्भुत सृष्टी वाटणाऱ्या कणभर माॅसपासून पाताळातून निघून आभाळात पोचलेल्या देवदारांपर्यंत अनेक अनेक चीजा त्याने आम्हाला दाखवल्या होत्या.

पण त्याने दाखवलेला पहाडी माणूस नावाचा हिरा तर कमालीचा लखलखता. अतिशय कष्टाचं जिणं, प्रतिकूल परिस्थिती, एक्स्ट्रीम क्लायमेट, लहरी पर्वतराजा या सगळ्यावर नितांत प्रेम करत आनंदाने जगणारे इथले स्थानिक

हा तर निसर्गाचा अद्भुत अविष्कार. शहरामध्ये मेडिटेशनचे वेगवेगळे क्लास करुनही असा नितळ, हसरा, शांत स्वभाव कमावणं अनेकांना जमलं नसेल. गरजा कमीत कमी ठेवणं, दुर्दम्य आशावाद, परस्परांवरील विश्वास आणि निसर्गाचे सानिध्य हा त्यांचा युएसपी असावा. अर्थात मार्केटच्या रेट्याने त्यांचं आयुष्यही बदलत चाललंय. सगळ्या सुविधा उपभोगणाऱ्या माझ्यासारख्या शहरी माणसांनी त्यांना काही सुचवणं चुकीचंच. पण त्यांना मनापासून शुभेच्छा!

आमच्यामध्ये सत्तरहून जास्त वय असलेल्या सर्वात उत्साही तरुणी होत्या आणि चिकनगुणियासारख्या अतिशय त्रास  देणाऱ्या आजारातून उठलेल्या साहसी विद्यार्थीनीही होत्या. विद्यार्थी शिकायला उत्सुक होतेच पण अतिशय उत्साही, गोड हसणाऱ्या, या वयातही कुतूहल जागतं ठेवणाऱ्या इकॉलॉजिकल सोसायटीच्या आद्य संस्थापक गोळे मॅडम, केतकी, मानसी, अजय सर, गुरुदास सर, केदार अशी ES ची दिग्गज मंडळी आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्साहाने उत्तर देत होते. त्याचबरोबर आम्हाला सगळं येतंय असा आव न आणता माहित नसलेल्या गोष्टी माहित नाही असंही म्हणत होते, दुसऱ्याकडून शिकत होते हे मला फार फार महत्वाचं वाटलं.

चक्रातातून जाताना आम्हाला प्रत्येकाला काही ना काही मिळालं होतंच. कुणाला ppt आणि नविन technology चे नवनवीन उपयोग कळायला लागलेत. बायनॉक धरुन फोकस करेपर्यंत पक्षी टिकत नाहीत असं म्हणणाऱ्या कोणाला बायनाॅक आणि मोबाईल यांची सांगड घालून फोटो काढण्याचं, कोणाला भल्या पहाटे सहा साडेसहाला उठण्याचं, कुणाला गरम आहे म्हणता म्हणता थंडगार झालेल्या पाण्याने आंघोळ करण्याचं, कुणाला सलग सातआठ दिवस नाॅनव्हेज न खाता राहण्याचं, कोणाला मोशन सिकनेसवर मात करण्याचं, कोणाला कुत्रा मांजर यासारख्या लाघवी प्रेमळ प्राण्यांवर हळूहळू प्रेम करु लागण्याचं कसब जमायला लागलंय.

जगी घाण अन चिखलची सारा,

म्हणो कितीही कुणी शहाणा |

पदोपदी मज कमळ घालते

गुणगंधाचा नवा उखाणा ||

 

ही बोरकरी वृत्ती आत्मसात करत प्रत्येकजण झाडं, किडे, पक्षी, दगड, माती, पाणी आणि अर्थात माणसं व त्यांची संस्कृती या सगळ्यांविषयी किंवा यातल्या किमान एखाद्या गोष्टीविषयी तरी कुतुहल दाखवू लागला आहे हे नक्की. आपण जेव्हा कुतूहलाने एखाद्या गोष्टीकडे बघतो तेव्हा ते ऑब्जेक्ट आणि आपण एका पायरीवर आलेलो असतो. कणव, दया उच्च नीचता मानणारी तर प्रेम समतेवर आधारलेलं असतं. एखाद्याविषयी कुतुहल जागं होणं ही प्रेम, मैत्री होण्याची पहिली पायरी असते. ही पायरी सगळ्यांनी चढली आहे. प्रेमाचा सिलसिला आता चालूच राहणार आहे.

FRI ला जाताना केतकीने रविंद्रनाथांनी लिहीलेलं आणि बालभवनच्या शोभाताई भागवतांनी अनुवादित केलेलं 'आम्ही झाडं बघू, आम्ही पक्षी बघू' हे गाणं तिच्या गाडीतल्या ग्रुपला शिकवलं. हे झाडं बघणं, पक्षी बघणं आणि हे सगळं ज्यानी बनवलं त्या निसर्गाला स्मरत राहणं आता चालूच राहणार आहे.

कालपरवाच्या लिखाणात गंमतीने बिच्छू रोपाच्या परागकणांचा उल्लेख केला होता. खरंतर गेल्या आठ नऊ दिवसात इतक्या पाॅझिटिव्ह एनर्जीच्या, शाश्वततेच्या, आनंदाच्या, निसर्गासोबतच्या सहजीवनाच्या कल्पनांचं, प्रकाशाच्या बीजांचं रोपण झालं आहे की दिवाळीच्या पूर्वसंध्येला सगळ्यांनी

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो

वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो  

 

हे गाणं म्हणायला हरकत नाही.

 

इतका छान अनुभव दिल्याबद्दल Ecological Society ला मनापासून धन्यवाद.

 

 

जयदीप कर्णिक,

Mobile No.: 9552599629

 

 

6 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Contact Us

Ecological Society

B-2, Jayanti Apartments,

Near Ratna Hospital,

Senapati Bapat Road,

Pune, India. 411016.

Connect with us
SUBSCRIBE to Newsletter

Thanks for submitting!

© 2019-24 by Ecological Society

bottom of page